गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील वेरूळ गावात प्रचारसभेदरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आणि पंधरा वर्षांपासून आमदार असलेले प्रशांत बंब यांच्याशी ग्रामस्थांनी थेट जाब विचारला. “पंधरा वर्षांत तुम्ही काय विकास केला?” या प्रश्नावरून आमदार बंब यांचा संताप उफाळून आला. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला “तुम्हाला तुमचं घर नीट चालवता येत नाही, आधी ते चालवा. मला राज्य चालवायचे आहे. गोंधळ घालणे बंद करा, नाहीतर कार्यकर्त्यांना सांगितले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल,” अशी थेट धमकी दिली.
प्रशांत बंब यांच्या प्रचारसभेत अनेक ग्रामस्थांनी रखडलेल्या रस्त्यांची कामे, पशुवैद्यकीय दवाखाना, पर्यटन केंद्र, रोजगाराच्या संधी याबाबत आक्रमक प्रश्न उपस्थित केले. यामुळे काहीकाळ सभेचा गोंधळ उडाला. ग्रामस्थांचे प्रश्न आणि आक्षेप ऐकून आमदार बंब यांचा संयम सुटल्याचे दिसून आले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली, ज्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सतीश लोखंडे नावाच्या ग्रामस्थाने पंधरा वर्षांच्या विकासकामांचा हिशोब मागितल्यावर बंब यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याशी उद्धट वर्तन केले, असा आरोप त्याने केला आहे. लोखंडे म्हणाले, “आम्ही मतदार म्हणून आमच्या प्रश्नांची उत्तरे मागण्याचा अधिकार आहे. पंधरा वर्षांतील विकासकामांची उत्तरं देण्याऐवजी आमदार धमक्या देत आहेत. हे लोकशाहीत अशोभनीय आहे.”
या घटनेनंतर खुलताबाद तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिक तापले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*