छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी सोडविण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना सहाय्यक फौजदार प्रदीप रामराव चव्हाण (वय ५२, रा. एन-१०, पोलिस कॉलनी, हडको) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदाराने ९ डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीसमोरील रस्त्यावर आपली दुचाकी (एमएच २० जीएफ ५७०२) पार्क केली होती. वाहतूक पोलिसांच्या लिफ्टिंग व्हॅनने ही दुचाकी उचलून छावणी ग्राउंडच्या वाहनतळावर नेली. दुचाकी परत मिळवण्यासाठी सहाय्यक फौजदार चव्हाण याने तक्रारदाराकडे १२०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर लाचेची रक्कम ७०० रुपये ठरली, त्यातील २०० रुपये कायदेशीर पावतीसाठी आणि ५०० रुपये लाच म्हणून घेतले जाणार होते. लाच घेताना चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पकडले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार रवींद्र काळे आणि साईनाथ तोडकर यांच्या पथकाने केली.
या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*