परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीच्या निषेधार्थ जमलेल्या आंदोलकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिले. जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असूनही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ लागू करण्याचा निर्णय घेतला.
कलम १६३ लागू; इंटरनेट सेवा बंद
जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहता, पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कलम १६३ लागू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घालून इंटरनेट, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे आणि ध्वनिक्षेपकांच्या सेवांवर बंदी घातली आहे. हे आदेश ११ डिसेंबर दुपारी १ वाजल्यापासून लागू असून, पोलिसांनी या आदेशांची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी असे निर्देश दिले आहेत.
आंदोलन चिघळले; पोलिसांचा हस्तक्षेप
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या समजून घेत शांततेचे आवाहन केले. मात्र, अचानक महिलांच्या एका गटाने कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. परिणामी, तणावपूर्ण शांततेला पुन्हा हिंसक वळण मिळाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सर्वांना शांततेचे आवाहन
जिल्हाधिकारी गावडे यांनी सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शहरात आणि जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*