छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्रीय युवा महोत्सवाचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. ललित कला गटासह एकूण २१ पारितोषिके जिंकत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. या यशामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांत आणि कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सांघिक विजेतेपदाचा मान
विद्यापीठाच्या संघाने ललित कला गटातील सर्व सात प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सांघिक विजेतेपद आणि प्रा. दिलीप बडे स्मृती चषकावर नाव कोरले. धाराशिव उपपरिसराच्या संघाने नाट्य गटातील विजेतेपदासह आठ पारितोषिके जिंकली. या यशामध्ये मार्गदर्शक संचालक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. शिरीष अंबेकर, डॉ. वैशाली बोधेले आणि डॉ. गजानन दांडगे यांचे मोलाचे योगदान होते.
समारोपाचा उत्सव आणि विजेत्यांचा सन्मान
शनिवारी महोत्सवाचा समारोप ढोल-ताशांच्या गजरात व कलावंतांच्या टाळ्या-शिट्यांच्या जल्लोषात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते समीर चौघुले आणि श्याम राजपूत यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
कलावंतांना प्रेरणादायी संदेश
समारोपाच्या कार्यक्रमात अभिनेते समीर चौघुले यांनी विद्यार्थ्यांना “शिकणे थांबवले, की व्यक्तिमत्त्वाचा विकास थांबतो,” असा संदेश दिला. तर अभिनेते श्याम राजपूत यांनी “आपल्या मातीतील कला सादर करा, तुमच्या कलेत नक्कीच यश मिळेल,” असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
लोककला महोत्सवाची घोषणा
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पुढील वर्षी लोककलेसाठी स्वतंत्र महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली. तसेच पुढील महोत्सवात शिस्तभंग अजिबात सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
केंद्रीय युवा महोत्सवाच्या या विजेतेपदामुळे मराठवाडा विद्यापीठाने आपली कला परंपरा अधिक मजबूत केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*