छ्त्रपती संभाजीनगर ते पुणे हा महामार्ग दिवसेंदिवस अधिक वर्दळीचा होत आहे. चारपदरी सुसज्ज रस्ता असूनही, पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सततच्या वाहतूक कोंडीमुळे साधारण पाच तासांचा प्रवास आता सात ते आठ तासांवर गेला आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पुणे येथे शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी आणि व्यावसायिक स्थलांतरित झाले आहेत. शिवाय, आयटी क्षेत्रातील तरुणांचीही मोठी संख्या पुण्यात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-पुणे हा महामार्ग मराठवाड्यातील सर्वाधिक व्यस्त मार्ग बनला आहे. रोज सुमारे पन्नास हजार वाहने आणि लाखभर प्रवासी या मार्गावर प्रवास करतात.
खड्डेमय रस्ता आणि पॅचवर्कची अतिरेकी समस्या
पुणे ते शिरूर हा रस्ता दर्जेदार असला तरी, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. अनेक ठिकाणी पॅचवर्क केल्यामुळे सलग गुळगुळीत रस्ता दिसत नाही, त्यामुळे प्रवाशांना प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. तीन विभागांतील वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे या महामार्गावर सततची वाहतूक कोंडी आहे.
ग्रीन फिल्ड महामार्गाची प्रतीक्षा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गाची घोषणा केली होती. हा महामार्ग झाला तर छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे अंतर केवळ दोन ते अडीच तासांत पार होईल, असा दावा होता. मात्र, या मार्गाच्या सर्वेक्षणाशिवाय अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
रेल्वे आणि हवाई मार्गाच्या प्रतीक्षेत
संभाजीनगर ते पुणे या मार्गावर दुहेरीकरणाची योजना आहे, आणि सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, निधीच्या अभावी यावर काम सुरू झालेले नाही. हवाई मार्गाची मागणीही अजूनही अपूर्णच आहे.
रोजच्या प्रवासात प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, महामार्गाच्या दुरुस्ती आणि सुधारणा यांवर त्वरित कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*