विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला असून बुधवारी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १४ आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या आणि आठवडी बाजार बंद राहणार आहेत.
२५ कोटींच्या उलाढालीवर परिणाम
धान्य, भाजीपाला, कटलरीसह विविध वस्तूंची सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल मतदानाच्या दिवशी ठप्प होणार आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक कण्या समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची इमारत मतदान केंद्रात रूपांतरित करण्यात आली आहे.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचा ताबा मंगळवार सकाळपासून निवडणूक आयोगाने घेतला असून तेथे मंडप उभारण्यात आले आहेत. पैठण, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, लासूर स्टेशन, सिल्लोड, वैजापूर येथेही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ९२ आठवडी बाजार भरतात. यापैकी लहान-मोठ्या बाजारांमध्ये ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. मात्र, मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी बुधवारी भरणारे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
लोकशाही सुदृढ करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासन व निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*