गेल्या काही आठवड्यांपासून छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या ग्रामीण भागात रात्री उडणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. शेतांवर आणि घरांच्या छतांवर ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. चोरी किंवा अन्य गुन्हेगारी कामांसाठी हे ड्रोन वापरले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला होता.
मात्र, या घटनेचा अखेर उलगडा झाला असून, हे ड्रोन शेती सर्वेक्षणासाठी वापरले जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील एका खाजगी कंपनीला शेती सर्वेक्षणासाठी ड्रोन वापरण्याची परवानगी दिली होती. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये हे ड्रोन फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरणासाठी वापरले जात होते.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीला सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. या सर्वेक्षणाचा उद्देश शेतीविषयक माहिती गोळा करणे हा होता, त्यामुळे याचा नागरिकांच्या सुरक्षेशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा, जर नागरिकांना रात्री ड्रोन दिसले, तर घाबरू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
काही गावांमध्ये ड्रोन रात्री उडत असल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला होता. परंतु, लांब पल्ल्याच्या गावांमध्ये उशीराने पोहोचल्यामुळे कधीकधी रात्रीही ड्रोन वापरावे लागत होते, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
याशिवाय, कोणत्याही इतर व्यक्तींनी परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*