मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती चौकात मराठा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको केला. तब्बल तासभर चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. शुक्रवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा रास्ता रोको करण्यात आला. शेकडो मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलक कृत्यांना थांबवून आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा हा पाचवा दिवस होता. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता, तरी देखील मराठा समाजाच्या बांधवांसोबत त्या रास्ता रोकोत सहभागी झाल्या. “सरकार लाडकी बहिण योजना सांगते, पण खरंच त्यांच्या मनात काही असते तर एका बहिणीला इथे उपोषण करायची वेळ आली नसती,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुढे कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
राजश्री उंबरे यांच्या आमरण उपोषणाला समाजातील अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. क्रांती चौकातील उपोषण स्थळी समाजबांधवांचा ओघ वाढत असून पोलिसांनी ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणचे बाळराजे आवारे यांनी उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या भेटीसाठी वेळ नसल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आंदोलनाच्या तिव्रतेमुळे पुढील काही दिवस क्रांती चौकात तगडा पोलिस बंदोबस्त राहण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*