कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल १२ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एमआयडीसी चिकलठाणा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईतील दोन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्याम त्रिलोकचंद अग्रवाल (वय ४५, रा. चिकलठाणा एमआयडीसी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. अग्रवाल यांचा कापसाच्या गाठी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, चिराग विनोदकुमार पित्ती आणि प्रवीण शेली (दोघे रा. मुंबई) यांनी त्यांच्याकडून कापसाच्या गाठी विकत घेतल्या होत्या. मात्र, खरेदी केलेल्या मालाची रक्कम आरोपींनी अद्याप दिली नाही. तसेच अग्रवाल यांचा राजस्थान, झालावाड येथील गोदामात ठेवलेला कापसाचा धागा आरोपींनी परस्पर विकून त्याची रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली.
अग्रवाल यांनी या व्यवहारासाठी एकूण १२ कोटी ६४ लाख ५३ हजार रुपयांची मागणी केली असता, आरोपींनी ‘तुमची कोणतीही रक्कम आमच्याकडे बाकी नाही,’ असे सांगत, बनावट लेजर बुक तयार करून रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.
फसवणुकीच्या या प्रकरणाने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*