छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर परिसरातील नाना-नानी पार्कसमोर शुक्रवारी (ता. 11 एप्रिल) सकाळी सात वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी इसमास आयशर ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील हायटेक कॉलेज ते आम्रपाली बुद्ध विहार दरम्यान असलेल्या नाना-नानी पार्कच्या समोर एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेला झोपलेला होता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इसम मानसिकरित्या अस्वस्थ (वेडसर) असावा. या ठिकाणी अनेक वाहनचालक आपली वाहने रस्त्यालगत अवैधरित्या उभी करतात.

अपघातग्रस्त ट्रक (एमएच 20 एटी 8846) देखील तिथेच उभी होती. शुक्रवारी सकाळी ट्रक चालक योगेश शिवचंद्र शिंदे ट्रक सुरू करत असताना त्याने समोर किंवा ट्रकखाली कोणी आहे की नाही, याची कोणतीही खात्री न करता निष्काळजीपणे गाडी सुरू केली. त्यावेळी ट्रकखाली झोपलेला अनोळखी इसम चिरडला गेला व जागीच मृत झाला.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमीस घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पाथरकर यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,205 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क