छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतदान शनिवार, दि. ७ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत शांततेत पार पडणार आहे. त्यानंतर मतमोजणी सोमवार, दि. ९ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र मतमोजणी केंद्रे निश्चित केली आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा येथे मतमोजणी होणार आहे. सोयगाव तालुक्याची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत करण्यात येणार आहे. सिल्लोड तालुक्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यशवंत महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात मतमोजणी केंद्र राहणार आहे.
कन्नड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इन-डोअर हॉलमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. फुलंब्री तालुक्यासाठी तहसील कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होईल. खुलताबाद तालुक्यात कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यासाठी विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी केली जाणार आहे.
गंगापूर तालुक्यात मुक्तानंद महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. पैठण तालुक्यासाठी संतपीठ पैठण येथील प्रशासकीय इमारत मतमोजणी केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. तसेच मतमोजणीदरम्यान उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*