छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून, गुरुवारपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एसडीआरएफच्या जवानांनी तब्बल ४० तासांच्या प्रयत्नांनंतर ही शोधमोहीम पूर्ण केली.

चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. एका निर्माणाधीन इमारतीचे सुमारे चार हजार चौरस फुटांचे स्लॅब अचानक कोसळले. स्लॅबला आधार देण्यासाठी लावलेल्या लाकडी बल्ल्या निसटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावेळी बांधकामस्थळी काम करणारे अंकुश शांताराम कांबळे आणि अशपाक शेख यांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यात ते किरकोळ जखमी झाले, तर खांडू वितनवरे थेट कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि हायड्रोलिक कटरच्या मदतीने मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. सलग २५ तासांच्या प्रयत्नांनंतर स्लॅबचे मोठे तुकडे आणि वाकलेले लोखंडी गज बाजूला करण्यात आले. मात्र, खांडू यांचा शोध लागत नव्हता.

दरम्यान, इमारतीच्या तळमजल्यावरील एका कोपऱ्यात विहीर असल्याने खांडू मलब्यासह त्यात पडले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात झाली. मात्र, विहिरीत अडकलेले लोखंडी गज, लाकडी ओंडके आणि काँक्रीटचे मोठे तुकडे यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. रात्री अंधार आणि सुरक्षेच्या कारणास्तव मोहीम थांबवावी लागली.

शनिवारी सकाळी धुळे आणि नाशिक येथील एसडीआरएफच्या विशेष पथकाने शोधमोहीम पुन्हा सुरू केली. सकाळी सातपासून मलबा हटविण्याचे काम वेगाने करण्यात आले. अखेर साडेनऊच्या सुमारास स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली खांडू वितनवरे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. या दुर्घटनेमुळे चिकलठाणा आणि साईनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

633 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क