छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील आणखी एका वन्यजीवाचा प्रवास संपला आहे. उद्यानातच जन्मलेल्या आणि याच नावाने ओळख निर्माण केलेल्या ‘सिद्धार्थ’ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी झुंज देणाऱ्या या वाघावर पशुवैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू होते. मात्र, वृद्धापकाळामुळे त्याची प्रकृती सुधारू शकली नाही. शुक्रवारी सकाळी उद्यान परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिद्धार्थची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली होती. त्याच्या हालचालींमध्ये जाणवण्याइतकी घट झाली होती, तसेच त्याने खाणेही कमी केले होते. मागील आठ दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू झाल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. अन्न घेणे पूर्णपणे बंद केल्यानंतर त्याला सलाईन, प्रतिजैविके आणि टॉनिकची इंजेक्शन्स देण्यात आली. उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी अनंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणीसंग्रहालयातील वाघांचे सरासरी आयुर्मान १६ ते १८ वर्षे असते. सिद्धार्थने १७ वर्षांचे आयुष्य पूर्ण केले होते. त्याच्या मृत्यूनंतर जिल्हा पशु चिकित्सालयातील तज्ज्ञांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षभरात दोन वन्यजीवांचा मृत्यू
सिद्धार्थ उद्यानासाठी मागील काही महिने वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटनांमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी समृद्धी वाघीण आणि सुचित्रा सिंहिणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयाला तीन वाघ देऊन त्या बदल्यात दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे आणण्यात आले होते.
पिवळे आणि पांढरे मिळून आठ वाघ
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या आठ झाली आहे. यामध्ये चार पिवळे आणि चार पांढरे वाघ आहेत. पिवळ्या वाघांमध्ये एक नर आणि तीन माद्या, तर पांढऱ्या वाघांमध्ये दोन नर आणि दोन माद्या आहेत. या सर्वांचे वय पाच ते आठ वर्षांच्या दरम्यान आहे. त्यामुळे आगामी काळात वाघांचे प्रजनन घडवून आणण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*