छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. गुरुवारी पहाटे जाहीर झालेल्या निकालात त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावर १८ हजार १२४ मतांनी मात केली. तब्बल ४५ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या मतमोजणीनंतर या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला.

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पहाटे ५.१० वाजता त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांना प्रमाणपत्र दिले.

मतांच्या हस्तांतरणाने बदलले निकालाचे चित्र

या निवडणुकीत एकूण ४१ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरात ७० टेबलांवर मतमोजणी करण्यात आली.

सुरुवातीच्या मोजणीत डॉ. पाटील यांना ७३ हजार ९३१, तर सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते मिळाली होती. मात्र, विजयासाठी निश्चित केलेला ८८ हजार ५५८ मतांचा कोटा दोघांपैकी कोणालाही गाठता आला नाही. त्यामुळे पसंतीक्रमानुसार मतपत्रिकांवरील मते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

कमी मते मिळालेल्या उमेदवारांना एकामागून एक वगळण्यात आले. अशा प्रकारे ३९ उमेदवारांची वगळणी झाल्यानंतर डॉ. पाटील आणि चव्हाण हे दोघेच शिल्लक राहिले. त्यानंतरच्या अंतिम मोजणीत डॉ. पाटील यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.

पहाटे निकाल, प्रमाणपत्राचे वितरण

मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती. मतपत्रिकांची छाननी, मतांची मोजणी आणि पसंतीक्रमानुसार हस्तांतरण यामुळे निकालासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चवरे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या समन्वयातून मतमोजणी सुरळीत पार पडली. अखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर पडदा पडला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

607 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क