छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शहरासह बीड बायपास, बाळापूर, वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक परिसरातील हॉटेल्स व कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने आठ अन्न व्यावसायिक आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सहाय्यक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांच्या आदेशानुसार ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी उंदीर आणि कीटकांचा वावर, तर काही ठिकाणी अन्न तयार करण्यासाठी वापरली जाणारी गंजलेली उपकरणे आढळली. कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अन्नपदार्थ थेट जमिनीवर साठवणे आणि स्वयंपाकघरात स्वच्छतेचे निकष न पाळणे, असे प्रकारही समोर आले.
बीड बायपासवरील निशांत पार्क रेस्टॉरंटमध्ये उंदीर व कीटक आढळण्यासोबतच अन्न तयार करण्याची उपकरणे गंजलेली होती. यापूर्वी सूचना देऊनही सुधारणा न केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. याच परिसरातील कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंटमध्येही कीड नियंत्रणाची योग्य व्यवस्था नव्हती. बाळापूर येथील टेबल नाईन गार्डन रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ जमिनीवर ठेवण्यात आले होते.
वाळूजमधील मिताली राजयोग रेस्टॉरंटमध्ये उपकरणांचे निर्जंतुकीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांकडे अॅप्रन व हातमोजेही नव्हते. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीला कॅन्टीन सेवा देणाऱ्या एफ.एस. सर्व्हिसेस प्रा. लि. येथे अस्वच्छ स्वयंपाकघर आणि तापमान नियंत्रणाचा अभाव दिसून आला. विद्या एन्टरप्राईजेसला सेवा देणाऱ्या एफडीसी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये गंजलेली उपकरणे व अस्वच्छ कच्चा माल आढळला.
ग्रीन प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये कीटकांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या होत्या. तसेच कच्चे-शिजवलेले आणि शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र ठेवल्याचे आढळले. शेंद्रा येथील राधाकृष्ण गृहउद्योगातही उत्पादन प्रक्रियेतील तापमान नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्या.
फेरतपासणीनंतरच परवाने पुन्हा सुरू होणार
एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आठही आस्थापनांना अन्न उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष तपासणीत त्रुटी दूर झाल्याची खात्री झाल्यानंतरच निलंबन मागे घेण्याबाबत स्वतंत्र आदेश दिला जाईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*