छत्रपती संभाजीनगर : चांदण्यांची शीतलता, हातात मसालेदार दुधाचा ग्लास आणि मित्रमंडळींसोबत गप्पांची रंगत… अशा उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीनगरकरांनी कोजागरी पौर्णिमेचा आनंद लुटला. रविवारी, २५ तारखेला शहरात कोजागरीनिमित्त साडेतीन ते चार लाख लिटर दूध संपल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मंदिरांपासून ते गृहनिर्माण सोसायट्या आणि विविध वसाहतींपर्यंत रात्री उशिरापर्यंत उत्सवाची धूम पाहायला मिळाली.

कोजागरी पौर्णिमा म्हणजे केवळ दूध पिण्याचा उत्सव नाही, तर एकत्र येण्याची आणि नात्यांमधील आपुलकी जपण्याची संधीही आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत मसालेदार दुधाचा आस्वाद घेतला. कुठे गाण्यांच्या मैफली रंगल्या, तर कुठे हास्यविनोद आणि गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला, हे समजलेच नाही. चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची परंपरा पाळत अनेकांनी लक्ष्मीपूजनही केले.

‘को जागर्ति’चा संदेश

कोजागरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे?’ अशी या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येऊन जागरण करणाऱ्या आणि भक्तीमध्ये रमलेल्या भक्तांना पाहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कोजागरीचे हे महत्त्व गुरूजी उद्धव वझूरकर यांनी सांगितले.

दुधात सुका मेवा, वेलची अन् चारोळी

कोजागरीसाठी तयार केल्या जाणाऱ्या दुधात वेलची, दालचिनी, सुका मेवा आणि चारोळी यांचा वापर केला जातो. त्यामुळे दुधाला खास चव मिळते. दूध हे कॅल्शियमचा चांगला स्रोत असून, त्यातील पोषक घटक शरीरासाठी उपयुक्त असतात. कोजागरीच्या रात्री दूध पिण्याच्या परंपरेला विशेष महत्त्व असल्याचे आयुर्वेदाचार्य डॉ. संध्या चव्हाण यांनी नमूद केले.

एकूणच, कोजागरी पौर्णिमेने शहरात धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक स्नेहाचा गोडवा वाढवला. दुधाच्या आस्वादासोबत जागलेल्या या रात्रीने संभाजीनगरकरांच्या उत्सवात आनंदाची भर घातली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

164 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क