छत्रपती संभाजीनगर : शेअर बाजारात मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक एका नागरिकाला महागात पडली. आयपीओमध्ये पैसे गुंतवून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुकुंदवाडीतील ३७ वर्षीय नागरिकाची ४८ लाख १५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, सुरुवातीला काही रक्कम परत देऊन आरोपींनी विश्वास संपादन केला आणि नंतर मोठ्या रकमेचा गंडा घातला. या प्रकरणाचा तपास मुकुंदवाडी पोलिस आणि सायबर शाखेकडून सुरू आहे.
फिर्यादी एचपीसीएल कंपनीत नोकरीला आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रिया कपूर नावाच्या महिलेचा त्यांना व्हॉट्सॲपवर संदेश आला. तिने स्वतःची ओळख अपस्टॉक्सच्या डीमॅट खात्यांशी संबंधित प्रतिनिधी म्हणून करून दिली. गुंतवणुकीसाठी खाते उघडण्याच्या बहाण्याने तिने त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली.
१८ सप्टेंबरला खाते मंजूर झाल्याचे सांगत त्यांना एका सपोर्ट टीमशी जोडण्यात आले. त्यानंतर ‘यूपीप्राइम’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. या अॅपवर गुंतवणुकीचे व्यवहार आणि परतावा दिसत असल्याने फिर्यादींचा विश्वास बसला. त्यांनी १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान विविध बँक खात्यांमध्ये ३९ लाख रुपये जमा केले. सुरुवातीला ५८ हजार रुपये आणि इतर काही रक्कम मिळाल्याने गुंतवणूक फायदेशीर असल्याचा त्यांचा समज झाला.
यानंतर आरोपींनी त्यांना ‘एव्हरेस्टिम्स आयपीओ’मध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. मात्र, स्वतःचे सहा लाख रुपये परत घेण्याचा प्रयत्न करताच त्यांची विनंती फेटाळण्यात आली. आयपीओचे वाटप पूर्ण झाल्यावरच पैसे काढता येतील, असे सांगून त्यांना थांबवण्यात आले.
६ ऑक्टोबरला अॅपवर १ लाख १२ हजार शेअर्स मिळाल्याचे आणि त्यांची किंमत ७८ लाख ३ हजार ४० रुपये असल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रक्कम काढण्याऐवजी उपलब्ध पैशांपेक्षा अधिक पैसे भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ९ ऑक्टोबरला सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर धाव घेतली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*