वाळूज महानगर : गुन्हे शाखेचे पोलिस असल्याची बतावणी करून तिघांनी एका व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना ए. एस क्लब रोडवर घडली आहे. तपासणीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडील सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेत आरोपींनी पोबारा केला. या घटनेत ४ लाख ६६ हजार ४९५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर मधुकर जाधवर (वय ५१, रा. अयोध्यानगर, बजाजनगर) हे २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कामानिमित्त मोटारसायकलवरून तिसगाव चौफुलीमार्गे ए.एस. क्लबच्या दिशेने जात होते. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता सूर्यवंशीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ते मित्राशी फोनवर बोलण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी दोन मोटारसायकलींवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
त्यापैकी एकाने आपण गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर जाधवर यांना गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी काढण्यास सांगितले. दागिने रुमालात बांधून पुन्हा परत देण्याचे आश्वासन दिल्याने जाधवर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत दागिने काढून दिले.
दरम्यान, आरोपींपैकी एकाने जाधवर यांचा मोबाइल खाली पाडला. मोबाइल उचलण्यासाठी ते खाली वाकले असता, तिन्ही आरोपींनी संधी साधली. विनानंबरच्या मोटारसायकलींवरून ते तिसगाव चौफुलीच्या दिशेने पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधवर यांनी आरडाओरड केली आणि आरोपींचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत आरोपी दूर निघून गेले होते.
सोन्याच्या चेनसह अंगठीही लंपास
चोरीला गेलेल्या ऐवजात २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ज्याची किंमत ३ लाख ७९ हजार २५० रुपये, तसेच ७.८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ज्याची किंमत ८७ हजार २४५ रुपये आहे, यांचा समावेश आहे.
जाधवर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींपैकी एका व्यक्तीचे वर्णन फिर्यादीने पोलिसांना दिले असून, त्याचा रंग गोरा, उंची जास्त आणि केसांची पोलिस कटिंग असल्याचे सांगितले आहे. त्याने पांढरा शर्ट व जिन्स परिधान केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*