छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या समस्येतून ऊर्जा निर्मितीचा मार्ग शोधला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्यासाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पामुळे शहरातून दररोज गोळा होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील ओल्या कचऱ्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, प्रकल्पाचे ठिकाण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्याप पुढील प्रक्रिया बाकी आहे.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी या प्रस्तावाची माहिती दिली. मुंबईत गुरुवारी राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांसाठी बीपीसीएलच्या गॅसनिर्मिती प्रकल्पासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर शहरातील ओला कचरा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

दररोज ३५० टनांपर्यंत ओला कचरा

शहरातून दररोज साधारण ५५० ते ६०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील सुमारे ३०० ते ३५० मेट्रिक टन कचरा ओला असतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून गॅसनिर्मिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या महापालिकेचे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत.

प्रकल्पासाठी चार ते पाच ठिकाणांचा विचार

हर्सूल चिकलठाणा आणि पडेगाव परिसरासह आणखी एक-दोन ठिकाणी प्रकल्पासाठी जागेची उपलब्धता तपासली जाणार आहे. यासाठी सीएमआरडीएकडेही जागेची मागणी करण्यात आली आहे. जागा निश्चित झाल्यानंतर बीपीसीएलसोबत करार करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

घरगुती गॅसपुरवठ्यालाही मिळणार चालना?

बीपीसीएलकडून शहरात पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसपुरवठा केला जातो. प्रस्तावित प्रकल्पातून तयार होणाऱ्या गॅसचा शहरातील पुरवठ्यासाठी उपयोग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन आणि गॅसनिर्मिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, ओल्या कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विविध सरकारी गॅस कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले. योग्य कंपनीची निवड करून पुढील काम दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतरच त्याची क्षमता, खर्च आणि गॅसपुरवठ्यावरील परिणाम स्पष्ट होणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

568 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क