छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट विसरून राहिले. मात्र, हॉटेल मालकाने या मौल्यवान ऐवजावर स्वतःचा हक्क न सांगता तो पोलिसांकडे जमा केला. पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज तिला परत केला. या घटनेमुळे त्रिमूर्ती आप्पा नाश्ता हॉटेलचे मालक आप्पासाहेब घोडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शेंद्रा परिसरातील लिबेर चौक येथील त्रिमूर्ती आप्पा नाश्ता हॉटेलमध्ये एका ग्राहकाचे कापडी पाकीट विसरून राहिले होते. हॉटेलचे मालक आजिनाथ श्रीराम घोडे आणि आप्पासाहेब श्रीराम घोडे यांना हे पाकीट मिळाले. त्यामध्ये ११ हजार ६२० रुपये रोख, अंदाजे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या रिंगा आणि एक सोन्याची अंगठी असा मौल्यवान ऐवज होता.

हा ऐवज मूळ मालकाला परत मिळावा, या उद्देशाने दोन्ही भावांनी ८ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्याकडे पाकीट सुपूर्द केले. त्यानंतर संबंधित महिलेचा शोध घेण्याच्या सूचना चिकलठाणा पोलिसांना देण्यात आल्या.

पोलिसांनी केलेल्या तपासातून हे पाकीट देवळाई येथील तेजस्विनी विष्णू इंगळे यांचे असल्याचे समोर आले. त्या ६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे जात असताना नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्याच वेळी त्यांचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट तिथेच राहिले होते.

२६ ऑक्टोबर रोजी पोलीस उपअधीक्षक (गृह) सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते हा ऐवज तेजस्विनी इंगळे यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यावेळी प्रामाणिकपणा जपणारे हॉटेल मालक आप्पासाहेब घोडे यांचाही सत्कार करण्यात आला.

यापूर्वीही दाखवला होता प्रामाणिकपणा

विशेष म्हणजे, १४ जुलै २०२६ रोजीही या हॉटेलमध्ये ग्राहकाचे लाखो रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र विसरून राहिले होते. त्यावेळीही घोडे बंधूंनी ते पोलिसांकडे जमा केले होते. त्यांच्या या कृतीचे पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आले होते. पुन्हा एकदा त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

441 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क