पैठण : गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पैठण नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हालचालींना आता वेग येणार आहे. कुंभपर्वाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून शनिवारी (दि. ३१) मोक्षघाटावर भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने ३१ फुटी उंच खांबावर १५ फुटांचा ध्वज फडकविण्यात येणार असून, धार्मिक कार्यक्रमासाठी संत-महंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठणला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोदावरी नदीच्या काठावरील कृष्णकमळ तथा दोलेश्वर तीर्थावरील मोक्षघाट येथे सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. नगराध्यक्षा विद्या भूषण कावसनकर, नगरसेवक आणि आयोजन समितीचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित राहतील.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत यापूर्वी शाही स्नान
पैठणच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला दीर्घ धार्मिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. २००३ आणि २०१५ मध्ये येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. विविध आखाड्यांतील नागा साधू, वैष्णव साधू, महामंडलेश्वर आणि अन्य संत-महंतांच्या सहभागामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. आगामी पर्वासाठीही शाही स्नानाचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन शाही स्नानांच्या तारखा जाहीर
आयोजन समितीच्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले, ३१ ऑगस्ट २०२७ रोजी दुसरे आणि १२ सप्टेंबर २०२७ रोजी तिसरे शाही स्नान नियोजित आहे. त्यानंतर २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरण होणार आहे.
शनिवारच्या ध्वजारोहणाने आगामी कुंभपर्वाच्या तयारीला औपचारिक सुरुवात होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वारकरी आखाडा परिषद पैठणचे अध्यक्ष महंत बळीराम महाराज जोगस, नगराध्यक्षा विद्या भूषण कावसनकर, संयोजक पवन लोहिया आणि आयोजन समितीने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*