छत्रपती संभाजीनगर : शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मसाला उत्पादन करणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या आस्थापनेवर छापा टाकून तब्बल २ हजार ८०२ किलो विविध प्रकारचा मसाला साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये असून संबंधित उत्पादन युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक २९९/पी, गाढे जळगाव येथे मेसर्स ५ स्टार मसाले या नावाने मसाला उत्पादनाचे काम सुरू होते. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने या ठिकाणी तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा मानके कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रशासनाने जप्तीची कारवाई केली.
कारवाईत ४८८ किलो हळद पावडर, ७९८ किलो मटण मसाला, ९१८ किलो मिरची पावडर आणि ५९८ किलो धणे पावडर असा एकूण २ हजार ८०२ किलो साठा जप्त करण्यात आला. या सर्व मालाची बाजारभावानुसार किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
जप्त करण्यात आलेला संपूर्ण माल सील करण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत हा साठा कंपनीचे अन्न व्यवसाय चालक शेख रेहमत शेख फसाद पटेल यांच्या ताब्यात सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आला आहे. या मालाची कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावू नये किंवा त्यात छेडछाड करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधित उत्पादन युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*