छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यापक तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाभरात तब्बल ५ हजार २४८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलीस दलासोबतच राज्य राखीव पोलीस बल, होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्यांचा समावेश आहे.

निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत २७ आरोपींना हद्दपार करण्यात आले असून सुमारे १ हजार २४ नागरिकांवर विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजकंटकांवर चाप बसण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातही मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येत आहे. दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलिसांनी १५ तलवारी, ३ गावठी कट्टे जप्त केले असून साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अमली पदार्थांविरोधात ५ मोठ्या कारवाया करत १२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीप्रकरणी २८४ गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय जिल्ह्यातील परवाना धारकांकडील ४८४ शस्त्र जमा करण्यात आली असून १६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग होऊ नये यासाठी ड्रोनद्वारेही निगराणी ठेवली जाणार आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि विविध पथकांचे अधिकारी निवडणूक सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासनाने नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले असून शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी पोलिसांचा हा व्यापक बंदोबस्त महत्त्वाचा ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

280 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क