छत्रपती संभाजीनगर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनांवर दगडफेक, टायर पंक्चर करून लूटमार आणि शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार समोर येत असतानाच आता शासकीय वाहनावरही हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात घडलेल्या या घटनेत पाच प्रवासी थोडक्यात बचावले.
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड हे चार सहकाऱ्यांसह शासकीय कामानिमित्त पुण्याकडे जात होते. त्यांच्याकडे महत्त्वाची सरकारी कागदपत्रे होती. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ४२६ जवळ पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक केली. दगड थेट वाहनाच्या समोरील काचेवर आदळल्याने काच फुटली. या अनपेक्षित प्रकारामुळे वाहनातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला.
या घटनेनंतर मदत मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत राठोड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामार्ग पोलिसांचे पथक २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले, मात्र आपत्कालीन मदतीसाठी ११२ क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जवळपास दोन तास वाट पाहूनही संबंधित पोलीस पथक मदतीला आले नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तक्रारीबाबत सूचना मिळाल्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले.
लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत लुटमारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. वैजापूर, सिंदखेडराजा, छत्रपती संभाजीनगर आणि सिन्नर परिसरात वाहन अडवणे, टायर पंक्चर करणे तसेच शस्त्रांचा धाक दाखवून लूट करण्याचे प्रकार घडले. छत्रपती संभाजीनगरमधील एका वकिलाच्या कुटुंबाकडून सुमारे १८ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. २ नोव्हेंबरला शहापूरजवळ जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही लक्ष्य करण्यात आले.
विकासाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून उभारलेल्या समृद्धी महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. केवळ आरोपींना अटक करण्याऐवजी अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी गस्त आणि तत्काळ आपत्कालीन मदतीची व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*