छत्रपती संभाजीनगर : शहरात पाणीपुरवठा कधी होणार, याबाबत नागरिकांना वारंवार महापालिकेच्या कार्यालयाचे किंवा कर्मचाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने डिजिटल यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. महापालिकेच्या ‘जल बेल’ अॅपमध्ये नव्याने सुविधा समाविष्ट करण्यात आल्या असून, आता नागरिकांना आपल्या भागातील पाणीपुरवठ्याची संभाव्य तारीख किमान १२ तास आधी समजू शकणार आहे. विशेष म्हणजे, जलवाहिनी फुटणे किंवा गळती होण्यासारख्या समस्यांची तक्रार केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली, हेदेखील अॅपवरून तपासता येणार आहे.
पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली होती. याची दखल घेत आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचाही विचार करून जल बेल अॅपमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
एका क्लिकवर मिळणार पाणीपुरवठ्याचा तपशील
अॅपमधील नव्या दिनदर्शिकेत रंगांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची स्थिती समजणार आहे. हिरवा रंग म्हणजे झालेला पाणीपुरवठा, पिवळा रंग म्हणजे आगामी पुरवठ्याची संभाव्य तारीख, तर लाल रंगातून पाणीपुरवठ्यातील अडचणी दर्शविल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मागील नोंदी तपासून पुढील पाणी कधी येऊ शकते, याचे नियोजन करता येईल. यासाठी अभियंत्यांना संबंधित माहिती नियमितपणे अॅपवर अद्ययावत करावी लागणार आहे.
तक्रारीनंतर दुरुस्तीचे फोटोही दिसणार
जलवाहिनीला गळती लागल्यास नागरिकांना संबंधित ठिकाणाची माहिती भरून थेट अॅपवर तक्रार पाठविता येईल. त्यानंतर अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्रही उपलब्ध होणार आहे. गेल्या आठ दिवसांत अशा प्रकारे २५ ठिकाणच्या गळतीची माहिती समोर आली असून, त्यापैकी १५ ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे.
दररोज १५ हजार नागरिकांचा वापर
जल बेल अॅप ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी डाउनलोड केले असून, दररोज १५ हजारांपेक्षा जास्त नागरिक त्याचा वापर करतात. शहरातील २०० हून अधिक ठिकाणच्या पाणीपुरवठ्याची माहिती या माध्यमातून दिली जाते. आतापर्यंत नागरिकांना अडीच लाखांहून अधिक सूचना पाठविण्यात आल्या आहेत. नव्या सुविधांमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि तक्रार निवारण प्रक्रियेवर नागरिकांना अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*