छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या वाढत्या विस्ताराचा परिणाम आता लगतच्या ग्रामीण भागावरही दिसू लागला आहे. वाळूज औद्योगिक परिसरासह आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या आणि नागरीकरण वाढत असल्याने या संपूर्ण भागासाठी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. वाळूजसह १२ ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करून नगर परिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. मात्र, हा भाग नगर परिषद होणार की स्वतंत्र ‘क’ वर्ग महापालिका म्हणून विकसित होणार, याचे उत्तर मार्च २०२७ नंतर मिळण्याची शक्यता आहे.
या संभाव्य बदलामुळे वाळूज, पंढरपूर, रांजणगाव आणि वडगाव कोल्हाटी परिसरातील नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांकडून ग्रामपंचायतींच्या हद्दी, लोकसंख्या आणि अन्य आवश्यक तपशील मागविले आहेत. काही विभागांकडून माहिती प्राप्त झाली असून, उर्वरित माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेसाठी लोकसंख्येची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. मार्च २०२७ मध्ये जनगणनेची माहिती उपलब्ध झाल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. त्यानुसार महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींचा आधार घेऊन पुढील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.
न्यायालयाच्या मंजुरीनंतर चर्चेला अधिक बळ
वाळूजमध्ये दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय सुरू करण्यास यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि नागरी सुविधांची गरज पुन्हा चर्चेत आली आहे. औद्योगिक विकासामुळे विस्तारलेल्या या भागाला स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा मिळाल्यास पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या नियोजनाला नवी दिशा मिळू शकते.
प्रस्तावित क्षेत्रात १२ गावांचा समावेश
वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे.पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपूर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या ग्रामपंचायतींचा प्रस्तावित क्षेत्रात समावेश आहे.
आता जनगणनेच्या आकडेवारीनंतर या परिसराला नगर परिषदेचा दर्जा मिळणार की ‘क’ वर्ग महापालिकेची निर्मिती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*