छत्रपती संभाजीनगर : देशाच्या लोकसंख्येची अद्ययावत आकडेवारी संकलित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. येत्या २५ जानेवारीपासून जिल्ह्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीला सुरुवात होणार असून, यासाठी प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती घेणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष गणनेपूर्वी नागरिकांना १० ते २४ जानेवारीदरम्यान ऑनलाइन स्वगणना करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दुसऱ्या टप्प्यातील जनगणना प्रक्रियेचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माहिती संकलनातील अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. जनगणनेचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत घरयादी आणि घरगणनेच्या स्वरूपात पार पडला. आता दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत हे काम चालेल. त्यानंतर १ ते ५ मार्चदरम्यान संकलित माहितीची फेरतपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील या मोहिमेसाठी ५,३१७ प्रगणक आणि ७३९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यासाठी १०६ प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना एकूण ४० प्रश्न विचारले जाणार असून, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक नोंदविणे आवश्यक राहणार आहे.
प्रशिक्षणाला जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सुनील आत्राम, जनगणना अन्वेषक मयूर पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जनगणनेतील प्रत्येक नोंद अचूक असणे महत्त्वाचे असून, या राष्ट्रीय कामात सर्व यंत्रणांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*