छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बिडकीन ऑरिक प्रकल्पाच्या विस्तारासाठी आता मोठी आर्थिक तरतूद प्रत्यक्ष कामाच्या दिशेने पुढे सरकली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर बी आणि सी विकसित करण्यासाठी तब्बल २,४५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात या परिसराचे स्वरूप बदलण्याची आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरशी संबंधित या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडकडून (एमआयटीएल) केली जाणार आहे. निवड होणाऱ्या कंपनीला केवळ बांधकामच नव्हे, तर संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन, डिझाइन, प्रत्यक्ष उभारणी, तपासणी आणि कार्यान्वयन करावे लागणार आहे. कंत्राट मिळाल्यानंतर ३६ महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर चार वर्षे संबंधित कंपनीला देखभालीचे कामही करावे लागेल.
उद्योगांसाठी स्वतंत्र जागांचे नियोजन
नव्या विस्तारात एकूण १,९८४.७१ हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. यामध्ये मोठ्या उद्योगांसाठी सर्वाधिक ७१७.०९ हेक्टर जागा ठेवण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक भूखंड देण्यासाठी २९४.८७ हेक्टर, निवासी वापरासाठी २९९.३८ हेक्टर, तर सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी ५६.६६ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. व्यावसायिक उपक्रमांसह रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि मोकळ्या जागांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
पाणी, वीज आणि रस्त्यांची समस्या सुटण्याची अपेक्षा
या विकासकामात केवळ रस्ते तयार करण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, सांडपाणी प्रक्रिया व वाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा, वीज उपकेंद्रे आणि भूमिगत केबल नेटवर्क यांचा त्यात समावेश आहे. नागरी आणि औद्योगिक सुविधांचे नियंत्रण आधुनिक स्काडा प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
१८ नोव्हेंबरला महत्त्वाची प्रक्रिया
निविदेच्या कार्यक्रमानुसार १८ नोव्हेंबरला प्रकल्पस्थळाची पाहणी आणि तांत्रिक निविदा उघडण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरला इच्छुक कंत्राटदारांची प्री-बिड बैठक होईल.
ऑरिकमध्ये गुंतवणूक केलेल्या कंपन्यांसाठी पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा विषय राहिला आहे. रस्ते, पाणी आणि अखंड वीजपुरवठ्याची व्यवस्था सक्षम झाल्यास उत्पादन आणि मालवाहतुकीतील अडथळे कमी होऊ शकतात. त्यामुळे या २,४५० कोटींच्या प्रकल्पाकडे केवळ बांधकाम म्हणून नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील औद्योगिक संधी वाढवणारे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*