छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर परतण्याची घाई प्रवाशांसाठी चांगलीच त्रासदायक ठरली. रविवारी (१५ नोव्हेंबर) शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एसटी महामंडळाची दोन्ही बसस्थानके आणि रेल्वेस्थानकावर दिवसभर गर्दीचे चित्र होते. अंदाजे ८० हजार प्रवाशांनी परतीचा प्रवास केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. त्यातच समृद्धी महामार्ग आणि जळगाव रोडवर वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला.

बस आणि रेल्वेत जागा मिळवण्यासाठी संघर्ष 

सुट्ट्या संपण्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासूनच प्रवाशांनी परतीची तयारी सुरू केली होती. रविवारी मात्र गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकावर तिकीट मिळवण्यासाठी तसेच बसमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू होती. आगाऊ आरक्षण नसलेल्या प्रवाशांना उपलब्ध बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता.

रेल्वे प्रवाशांची परिस्थितीही बिकट होती. सचखंड, मराठवाडा, देवगिरी, तपोवन, नंदीग्राम, गुंटूर आणि हडपसर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनेक डब्यांमध्ये उभे राहायलाही जागा मिळणे कठीण झाले होते. आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही काही ठिकाणी जागा मिळवताना अडचणी आल्या. आधीच्या स्थानकांवरूनच जागा व्यापल्या गेल्याने प्रवाशांमध्ये वादावादी झाली. दरम्यान, रेल्वे मार्गावरील कामांमुळे मागील काही दिवस गाड्यांना विलंब होत होता; मात्र रविवारी ब्लॉक नसल्याने रेल्वे वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू होती.

सावंगी बायपासवर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिकाही अडकली 

शहरातील वाहतुकीची परिस्थितीही गंभीर बनली होती. जळगाव महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा ओघ वाढल्याने सावंगी बायपास परिसरात मोठी कोंडी झाली. रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अडीच किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना जवळपास एक तास लागत होता.

या कोंडीचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवांनाही बसला. सायरन वाजवत असलेली रुग्णवाहिका वाहनांच्या गर्दीत अडकली. बाजूला होण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने तिला मार्ग काढताना अडचणी आल्या. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे लागले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनांचा मोठा ओघ पाहता कोंडी सोडवणे आव्हानात्मक ठरले.

दिवाळीनंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने नागरिक परतीच्या प्रवासाला निघाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि महामार्गांवरील गर्दीचे चित्र स्पष्ट झाले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

224 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!