छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत असून, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारवा जाणवत असताना दुपारी मात्र उन्हाचा कडाका वाढत आहे. सूर्यास्तानंतर पुन्हा वातावरणात थंडावा निर्माण होत आहे. दरम्यान, शनिवारी यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याने शहरात थंडीची चाहूल अधिक स्पष्ट झाली आहे.
शनिवारी शहराचा पारा किमान १५.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला, तर कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात हळूहळू बदल होत असून, कमाल आणि किमान तापमानाचा आलेख घसरताना दिसत आहे. मात्र, रात्री आणि दिवसाच्या तापमानातील तफावत कायम असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा सामना करावा लागत आहे.
थंडी वाढणार, पण सातत्य राहणार नाही!
हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या माहितीनुसार, सध्या तापमानात अपेक्षेप्रमाणे मोठी घट झालेली नाही. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत थंडावा जाणवतो; त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढू लागते. दक्षिणेकडील भागात चक्रवाताची स्थिती बळावत असल्याने वातावरणात असे बदल होत आहेत.
उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव आगामी काळात छत्रपती संभाजीनगरच्या वातावरणावरही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात तापमान आणखी खाली येऊ शकते. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंडीचा प्रभाव दीर्घकाळ टिकण्याची शक्यता कमी असल्याचे औंधकर यांनी सांगितले.
डिसेंबरअखेरपर्यंत तापमानात चढ-उतार
डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कधी थंडी, तर कधी उष्णता असे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही हवामानात संमिश्र स्वरूपाचे बदल जाणवू शकतात. त्यामुळे शहरात सध्या सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा वाढणार की पुन्हा तापमानात वाढ होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*