छत्रपती संभाजीनगर : हातात सामान, सोबत लहान मुले आणि बस पकडण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशा परिस्थितीत प्रवाशांचे लक्ष दुसरीकडे असतानाच चोरटे आपला डाव साधत आहेत. बसस्थानकांवरील गर्दी आता प्रवाशांच्या खिशाला आणि दागिन्यांना कात्री लावणारी ठरत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल आणि सिडको बसस्थानक परिसरात घडलेल्या दोन चोरीच्या घटनांनी ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. अवघ्या दोन दिवसांत चोरट्यांनी दोन प्रवाशांच्या कुटुंबांना लक्ष्य करत सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

हर्सूल परिसरातील घटनेत सिल्लोड येथील सुवर्णा बेलेकर यांना मोठा आर्थिक फटका बसला. भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या सुवर्णा या पती आणि मुलांसह गावी परतत होत्या. प्रवासात सुरक्षिततेसाठी त्यांनी अंगावरील सर्व दागिने काढून छोट्या पर्समध्ये ठेवले होते. मात्र, हर्सूल टी-पॉईंटवर बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीत चोरट्यांनी हीच पर्स लक्ष्य केली. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने पर्स उघडून पाहिली असता दागिने आणि 50 हजार रुपये गायब असल्याचे समोर आले. या प्रकरणी हर्सूल पोलीस तपास करत आहेत.

दुसरीकडे, सिडको बसस्थानकावरही अशाच प्रकारे चोरी झाली. सांगली जिल्ह्यातील शिक्षक प्रशांत वानखेडे हे कुटुंबासह जालन्याकडे जात असताना त्यांच्या पत्नीच्या पर्समधील दागिने चोरीला गेले. मांडीवर लहान बाळ आणि बसमध्ये चढण्याची लगबग असताना चोरट्यांनी संधी साधली. जालन्यात पोहोचल्यानंतर पर्समधील सोन्याचे गंठण, सोनसाखळी, झुमके, चांदीच्या बांगड्या आणि इतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

गर्दीचा फायदा, प्रवाशांना फटका!

विशेष म्हणजे, याच बसस्थानक परिसरात यापूर्वीही तीन प्रवाशांना चोरीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बसस्थानकांवर चोरट्यांचे जाळे सक्रिय असल्याची चिंता व्यक्त होत आहे. प्रवाशांनी गर्दीत मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

116 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!