छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाच्या परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका प्रकाराने शहरात चर्चा सुरू झाली आहे. बंगल्याच्या मागील बाजूस मद्यपान करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हस्तक्षेप त्यांना खटकल्याने वादाचे रूपांतर गोंधळात झाले. संतापलेल्या तरुणांनी बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस कर्मचारी परिसरात तैनात होते. त्याचवेळी बंगल्याच्या मागील बाजूस काही व्यक्ती मद्यपान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून संबंधित व्यक्तींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढत गेल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली. संबंधित तरुणांकडून बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिस कर्मचारी आणि तरुणांमध्ये झटापटही झाली. या धक्काबुक्कीत एका सुरक्षा कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती शांत केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पंचविशीतील दोन तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांकडून नेमका काय प्रकार घडला, याची चौकशी केली जात आहे.
विशेष म्हणजे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली असून, शिरसाट यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*