छत्रपती संभाजीनगर : रेल्वेने प्रवास करताना तिकीट न काढणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात नांदेड रेल्वे विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत २ हजार ९१७ प्रवासी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. या सर्वांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल २५ लाख ७५ हजार ९४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सणांच्या दिवसांत रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत असल्याने आरक्षित जागांवर अनधिकृत प्रवाशांचा वावर वाढतो. याचा फटका नियमानुसार तिकीट काढून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतो. ही समस्या रोखण्यासाठी नांदेड विभागाने विशेष पथके तैनात करून रेल्वे गाड्यांमध्ये अचानक तपासणी सुरू केली. सलग दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत २४ तासांच्या कालावधीत विविध गाड्यांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत विनातिकीट प्रवास, तिकिटापेक्षा वेगळ्या श्रेणीत प्रवास करणे तसेच नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त किंवा विनानोंदणी सामान वाहून नेणे अशा प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एका दिवसात १ हजार ५०२ प्रकरणे नोंदवून १३ लाख ५६ हजार ४७५ रुपये दंड जमा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी १ हजार ४१५ प्रकरणांतून १२ लाख १९ हजार ४६५ रुपये वसूल झाले.
विशेष म्हणजे, या तपासणीदरम्यान ११४ विनातिकीट प्रवासाची, ४२१ अनियमित प्रवासाची आणि १६७ नियमबाह्य सामान वाहतुकीची प्रकरणेही नोंदविण्यात आली. रात्रीच्या वेळेतही तपासणी सुरू ठेवण्यासाठी रेल्वेच्या ३१ कर्मचाऱ्यांसह सुरक्षा दलाची मदत घेण्यात आली. त्यांच्या माध्यमातून २६ रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली.
सहायक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार यांच्या नियोजनातून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि इतर पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील काळातही अशा तपासण्या सुरू राहण्याची शक्यता असून, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईतून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*