छत्रपती संभाजीनगर : पत्नीची छेड काढल्याचा संशय मनात धरून तीन जणांनी कट रचत ५१ वर्षीय कंत्राटदाराचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना करमाड एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. इंद्रजित बाबुराव खुळे असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून प्रियम कुशवाह आणि रवी कुशवाह या दोघांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार ऋषभ श्रीवास्तव अद्याप फरार आहे.
गोलटगाव येथील रहिवासी असलेले इंद्रजित खुळे हे २३ ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते. ते घरी परतले नसल्याने त्यांच्या पुतण्याने करमाड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, करमाड एमआयडीसी परिसरातील एका निर्जन चेंबरमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पाहणी केली असता चेंबरमध्ये खुळे यांचा कुजलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
पत्नीच्या छेडछाडीच्या संशयातून हत्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रियम कुशवाह याच्या मनात खुळे यांनी आपल्या पत्नीची छेड काढल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने साथीदारांच्या मदतीने खुळे यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. खुळे यांना करमाड एमआयडीसीतील एका प्लॉटकडे नेण्यात आले. तेथे लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या विटांनी त्यांच्या डोक्यावर तसेच शरीरावर वार करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे उत्तर प्रदेशातून प्रियम कुशवाह आणि रवी कुशवाह यांना अटक केली. मात्र, हत्याकांडातील मुख्य सूत्रधार ऋषभ श्रीवास्तव हा अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या चौकशीतून हत्येमागील आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*