छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या रात्री आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके अनेकांना आकर्षित करतात. मात्र, याच फटाक्यांमुळे अनेक कुटुंबांना रुग्णालयाची पायरी चढावी लागते. फटाके पेटवताना झालेली एखादी छोटी चूक हात-पाय भाजण्यापासून ते डोळ्यांची दृष्टी गमावण्यापर्यंत गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे सणाचा उत्साह कायम ठेवायचा असेल, तर सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करू नका, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिला आहे.

दिवाळीत घरासमोर किंवा रस्त्यावर फटाके फोडण्याची लगबग असते. या वेळी अनेकदा सुरक्षित अंतर, योग्य कपडे आणि फटाके हाताळण्याचे नियम दुर्लक्षित केले जातात. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. मुलांच्या हातात फटाके देऊन त्यांना एकटे सोडणे टाळावे. फटाके पेटवण्यापासून ते तेथून सुरक्षित अंतरावर जाण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मोठ्या व्यक्तीने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बॉम्ब आणि रॉकेटसारख्या धोकादायक फटाक्यांपासून मुलांना दूर ठेवावे.

फटाके फोडण्यासाठी बाहेर पडताना कपड्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नायलॉन किंवा कृत्रिम कापडाचे कपडे आगीच्या संपर्कात आल्यास त्वचेला चिकटून गंभीर भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती आणि अंगाला व्यवस्थित बसणारे कपडे वापरावेत. फटाके फोडण्याच्या जागी पाणी व वाळूची बादली ठेवणेही आवश्यक आहे.

अनेकदा फटाका पेटवल्यानंतर तो फुटला नाही, तर काहीजण कुतूहलापोटी त्याच्या जवळ जातात. हीच चूक धोकादायक ठरू शकते. न फुटलेल्या फटाक्याला पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. त्यातील दारू काढून प्रयोग करणेही टाळावे.

दिवाळीचा खरा आनंद हा कुटुंबीयांसोबत सुरक्षितपणे सण साजरा करण्यात आहे. त्यामुळे फटाक्यांच्या उत्साहात निष्काळजीपणा करू नका आणि स्वतःसह इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहन डॉ. अनुपम टाकळकर यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

161 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क