छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटले की घराघरांत साफसफाई आणि बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. मात्र या काळात शहरात कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेने यंदा स्वच्छतेसोबतच जुन्या वस्तूंच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. शहरातील २९ प्रभागांमध्ये विशेष संकलन व्यवस्था उभारण्यात आली असून, बाजारपेठांची स्वच्छता राखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करणार आहेत.

आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने या मोहिमेचे नियोजन केले आहे. दिवाळीच्या साफसफाईत अनेक घरांमधून जुने कपडे, चप्पल, बूट, भांडी, फर्निचर तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर काढल्या जातात. यातील अनेक वस्तू वापरण्यायोग्य असूनही त्या इतर कचऱ्यासोबत फेकल्या जातात. परिणामी कचऱ्याचा भार वाढतो. याला पर्याय म्हणून महापालिकेने या वस्तूंसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

बाजारपेठांमध्ये रात्री विशेष स्वच्छता

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी होत आहे. त्यामुळे दुकाने आणि रस्त्यांच्या परिसरात कचरा साचण्याची शक्यता वाढली आहे. हे टाळण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त कचरा संकलन वाहनांसह विशेष स्वच्छता पथके तैनात केली आहेत. रात्री ११ ते पहाटे २ या वेळेत प्रमुख बाजारपेठा आणि व्यापारी परिसरांची स्वच्छता केली जात आहे.

जुन्या वस्तू ठरणार गरजूंना उपयोगी

प्रभागनिहाय गोळा केलेले साहित्य आरआरआर (रिड्यूस, रियूज, रिसायकल) केंद्रांमध्ये जमा केले जाणार आहे. त्यातून चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू गरजू नागरिकांना देण्यात येतील. काही वस्तू सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

त्यामुळे घरातील अडगळ दूर करण्याबरोबरच दुसऱ्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद निर्माण करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. शहरवासीयांनी जुन्या वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता महापालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

232 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क