छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या चार मिठाई उत्पादक प्रतिष्ठानांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मिठाई उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित प्रतिष्ठानांमध्ये अस्वच्छता, गंजलेली उपकरणे, अन्न व पाण्याच्या प्रयोगशाळा चाचण्यांचा अभाव, अपुरे वायुवीजन आणि उत्पादन प्रक्रियेतील तापमान नियंत्रणाबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

या चार प्रतिष्ठानांवर कारवाई

1. मे. बालाजी बिकानेर मिठाईवाला (अयोध्यानगर, वडगाव कोल्हाटी) : तपासणीत केवळ ३५ टक्के गुण मिळाले. अपुरे वायुवीजन, गंजलेली उपकरणे, अन्न चाचण्यांचा अभाव आणि सफाईच्या रसायनांसाठी स्वतंत्र साठवणूक नसल्याचे आढळले.

2. मे. मधुर मिलन एंटरप्रायझेस (एमआयडीसी रेल्वे स्टेशन) : या प्रतिष्ठानाला केवळ १४ टक्के गुण मिळाले. तपासणीत ३२ गंभीर त्रुटी आढळल्या. अनधिकृत पॅकिंग साहित्य, पाण्याची कमतरता आणि FIFO नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.

3. मे. राजस्थानी बिकानेर प्रॉडक्ट (रेल्वे स्टेशन रोड, एमआयडीसी) : तपासणीत १४ टक्के गुण मिळाले असून ३४ त्रुटी आढळल्या. गंजलेली उपकरणे, निसरडी फरशी, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे कारवाई करण्यात आली.

4. मे. जगदंबा स्वीट्स (बजाजनगर, वडगाव कोल्हाटी) : या प्रतिष्ठानाला १९ टक्के गुण मिळाले. कीड नियंत्रण, स्वच्छतेचे वेळापत्रक, मोजमाप साधनांचे कॅलिब्रेशन आणि पुरवठा साखळीतील निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळले.

उत्पादन आणि विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश

निलंबनाच्या कालावधीत संबंधित प्रतिष्ठानांना अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, विक्री आणि वितरण पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधी अहवाल, छायाचित्रे आणि प्रयोगशाळा चाचण्यांचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. सक्षम अधिकाऱ्यांची फेरतपासणी आणि लेखी परवानगी मिळाल्यानंतरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे.

दरम्यान, संबंधित भागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना या प्रतिष्ठानांवर नियमित पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही. सर्व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे,” असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने FDA च्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

453 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क