छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६ हजार प्रस्ताव महापालिकेकडे जमा झाले असून, या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे १२५ कोटी रुपयांची भर पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आता या सर्व प्रस्तावांची तपासणी करून पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे.
गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांसाठी महापालिकेने १५ जुलैपासून विशेष सवलत उपलब्ध करून दिली होती. खुल्या भूखंडांच्या नियमितीकरणासाठी भरावे लागणारे बेटरमेंट शुल्क निम्मे करण्यात आले, तर घरांच्या बांधकामावरील प्रशमन शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली. या निर्णयामुळे नियमितीकरणाचा खर्च कमी झाल्याने अनेक मालमत्ताधारकांनी अर्ज करण्यास प्राधान्य दिले.
३१ ऑक्टोबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्याने शेवटच्या काही दिवसांत गुंठेवारी विभागात नागरिकांची गर्दी वाढली होती. अंतिम दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी मोठी लगबग पाहायला मिळाली. मुदत संपल्यानंतर आता नवीन प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया बंद झाली आहे.
प्रमाणपत्रांसाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी
आता महापालिकेला प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करावी लागणार आहे. प्रत्येक अर्जातील कागदपत्रांची वैधता तपासण्यासोबतच बांधकामाची स्थिती आणि जागेची प्रत्यक्ष पाहणीही केली जाणार आहे. अर्जांची संख्या मोठी असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला अतिरिक्त नियोजन करावे लागणार आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पात्र अर्जदारांना नियमितीकरणाची प्रमाणपत्रे देण्यासाठी अंदाजे २० ते २५ दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर छाननीच्या कामाला वेग देऊन प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला उपमहापौर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजीद बिल्डर आणि आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*