छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध असणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरात ई-वाहन चार्जिंग सुविधेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या दोन ठिकाणी केंद्रे कार्यान्वित झाली असून, आणखी पाच ठिकाणी अशी सुविधा निर्माण करण्याची तयारी सुरू आहे.

शहरातील कॅनॉट प्लेस आणि बाबा पेट्रोल पंप चौक या दोन ठिकाणी नव्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. महापालिकेने गो-इगो या खासगी कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून वाहनधारकांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या केंद्रांवर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक युनिटमागे २० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पात महापालिकेचा ४० टक्के आणि कंपनीचा ६० टक्के आर्थिक सहभाग असणार आहे. नागरिकांना वापरानुसार शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेता येईल.

चारचाकी वाहनांसाठी हायस्पीड चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली असली, तरी दुचाकी चार्ज करताना सिंगल फेजमुळे अधिक वेळ लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी चार्जिंग यंत्रणेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमोल कुलकर्णी यांनी दिली.

पाच नव्या ठिकाणांचा शोध 

सध्या सुरू असलेल्या दोन केंद्रांव्यतिरिक्त शहरातील आणखी पाच वर्दळीच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी आवश्यक जागा महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार असून, यंत्रणा उभारणे आणि देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असेल. नागरिकांना पे अँड यूज पद्धतीने ही सुविधा वापरता येईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील ई-वाहनधारकांना चार्जिंगसाठी अधिक पर्याय मिळणार आहेत. त्याचबरोबर शहरात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

193 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क