छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून छत्रपती संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीची लालपरी सज्ज झाली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी जाण्यास प्राधान्य देतात. याशिवाय सुट्ट्या संपल्यानंतर नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी, बसस्थानकांवर गर्दी होऊन नियमित बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. २ नोव्हेंबरपासून दररोज ४४ जादा बस चालविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

आठ आगारांतून विशेष बससेवा

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकासह पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि सोयगाव या आठ आगारांतून जादा बस सोडल्या जाणार आहेत. नागपूर, अकोला, बुलढाणा, शेवगाव, पुणे, नाशिक, भुसावळ, येवला, धुळे, मालेगाव, जळगाव आणि नेवासा यांसह विविध मार्गांवर या बस धावणार आहेत. या अतिरिक्त बससेवेमुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.

भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला

दिवाळीच्या गर्दीच्या काळात यापूर्वी एसटी प्रवासभाड्यात हंगामी वाढ केली जात होती. यंदा १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तिकिटांच्या दरात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठवला होता. मात्र, दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे यंदा जादा बससेवेचा लाभ घेताना प्रवाशांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार नाही. एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

390 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क