छत्रपती संभाजीनगर : अपत्यप्राप्तीसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि उपचारांचा खर्च परवडत नसल्याने माघार घेणाऱ्या दांपत्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आता स्वतंत्र आणि अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्रासाठी शासनाने १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी दिली आहे.

वंध्यत्वावरील उपचारांसाठी खासगी क्षेत्रात मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सामान्य असलेल्या अनेक दांपत्यांना आयव्हीएफसारख्या उपचारांचा पर्याय निवडणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेता घाटीमध्ये शासकीय स्तरावर ही सुविधा विकसित करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

सुपर स्पेशालिटी इमारतीत स्वतंत्र व्यवस्था

घाटीच्या सुपर स्पेशालिटी बिल्डिंगमध्ये (एसएसबी) या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि आधुनिक उपकरणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्रात आयव्हीएफ आणि आयसीएसआय या दोन्ही उपचार पद्धतींसाठी स्वतंत्र सेटअप, तसेच आयव्हीएफ प्रक्रियेसाठी ऑपरेशन क्लीन रूम तयार केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी डॉ. सोनाली देशपांडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

इतर जिल्ह्यांतील रुग्णांनाही फायदा

या केंद्राचा लाभ केवळ छत्रपती संभाजीनगर शहरापुरता मर्यादित राहणार नसून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या दांपत्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो. शासकीय रुग्णालयात आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खासगी उपचारांवरील आर्थिक अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे अनेक वर्षांपासून अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांसाठी घाटीतील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

135 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क