छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीसाठी आता ओटीपी किंवा बँक खात्याचा पासवर्ड मिळवण्याचीही गरज उरलेली नाही. मोबाइलचा ताबा मिळवून थेट आर्थिक व्यवहार करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. सातारा परिसरातील एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला याच पद्धतीने सायबर भामट्यांनी तब्बल ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचा आर्थिक फटका दिला. विशेष म्हणजे, त्यांनी कोणालाही ओटीपी सांगितला नव्हता किंवा स्वतः कोणताही व्यवहार केला नव्हता.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास संबंधित ज्येष्ठ नागरिक घरी असताना त्यांच्या मोबाइलवर बँकेच्या व्यवहारांचे ई-मेल धडाधड येऊ लागले. सुरुवातीला नेमके काय घडत आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय सॅफिरो क्रेडिट कार्डवरून एकापाठोपाठ व्यवहार होत असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने बँकांशी संपर्क साधला.

आपल्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार सुरू असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही बँक खाती आणि क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती केली. मात्र, बँकेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सायबर चोरट्यांनी आपला डाव साधला होता. रात्री आठ ते ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान वेगवेगळ्या खात्यांतून पैसे वळते करण्यात आले.

यामध्ये पहिल्या बँक खात्यातून १ लाख ८३ हजार रुपये, दुसऱ्या खात्यातून ४८ हजार २ रुपये ४० पैसे आणि क्रेडिट कार्डमधून ४ लाख ९९ हजार ७६१ रुपये काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचे नुकसान झाले.

रिमोट अॅक्सेसद्वारे मोबाइलवर नियंत्रण 

या प्रकारात मोबाइलचा रिमोट अॅक्सेस मिळवून बँक व्यवहारांवर नियंत्रण मिळवले जात असल्याचा संशय आहे. बनावट अॅपच्या माध्यमातून मोबाइलमधील एसएमएस आणि स्क्रीनवरील माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वापरकर्त्याला व्यवहाराची माहिती मिळण्यापूर्वीच सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक गैरव्यवहार होऊ शकतो.

या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

359 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क