छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हैदराबाद येथील खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरासाठी ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण रविवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, नव्या एसी बसमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नसून, तिकिटांचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत बस
नव्या इलेक्ट्रिक बस सोमवारपासून (दि. २ नोव्हेंबर) सकाळी ५.४५ वाजल्यापासून रस्त्यावर धावण्यास सुरुवात करतील. रांजणगाव, वेरूळ, विद्यापीठ आणि हडको-सिडको या मार्गांवर या बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांना वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.
या बसच्या संचालनासाठी चालक, देखभाल, चार्जिंग आणि कार्यशाळेतील मनुष्यबळाची व्यवस्था संबंधित कंपनीकडून केली जाणार आहे. तर बस वाहक आणि तिकीट मशीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेकडे असेल. प्रत्येक बस एक किलोमीटर धावल्यावर संबंधित कंपनीला ५९ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती बस विभागप्रमुख प्रमोद देशमुख यांनी दिली.
२०१८ पासून शहर बससेवेला गती
२०१८ पूर्वी शहरात नियमित सार्वजनिक बस वाहतुकीची व्यवस्था नव्हती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने १०० डिझेल बस खरेदी करून शहर बससेवा सुरू केली. या सेवेचा विस्तार होत असून, सध्या ६७ डिझेल बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. दररोज सुमारे १५ ते १८ हजार नागरिक या बससेवेचा लाभ घेतात. आता इलेक्ट्रिक बस दाखल झाल्याने शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळ मिळणार आहे.
इतर प्रकल्पांचेही लोकार्पण
या कार्यक्रमात मिटमिटा येथील महापालिका शाळेची इमारत, सोलार प्रकल्प आणि ईव्ही चार्जिंग स्टेशनचेही लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, पीएम ई-बस योजनेंतर्गत महापालिकेला १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यापैकी २७ बस शहरात दाखल झाल्या आहेत. मात्र, आवश्यक चार्जिंग स्टेशन तयार नसल्यामुळे त्यांची सेवा अद्याप सुरू झालेली नाही. चार्जिंगची पायाभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतर या बसही टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील ई-बसची संख्या वाढून नागरिकांना अधिक चांगला सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*