छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. सुंदरवाडी येथून भेसळयुक्त किंवा मिथ्याछाप असल्याच्या संशयावरून २० लाख रुपयांहून अधिक किमतीचे पतंजली गायीचे तूप जप्त करण्यात आले, तर लासूर स्टेशन येथील रवी ऑइल इंडस्ट्रीज या तेल रिपॅकिंग युनिटचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
सुंदरवाडीत २,२८० लिटर पतंजली तूप जप्त
सुंदरवाडी येथील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या मेसर्स दिव्य महावितरक या पतंजली आयुर्वेद सुपर डिस्ट्रीब्युटरच्या गोदामावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या गायीच्या तुपाच्या साठ्यात भेसळ किंवा चुकीचे लेबलिंग असल्याचा संशय आल्याने प्रशासनाने तो जप्त केला.
या कारवाईत एकूण ४,०३२ युनिट्समधील २,२७९.७ लिटर तूप जप्त करण्यात आले. त्याची किंमत तब्बल २० लाख २० हजार १९० रुपये आहे. यामध्ये एका बॅचमधील २,९९८ युनिट्स तुपाची किंमत १२ लाख २९ हजार १८० रुपये, तर दुसऱ्या बॅचमधील १,०३४ युनिट्स तुपाची किंमत ७ लाख ९१ हजार १० रुपये आहे.
अन्न सुरक्षितता व मानके कायद्यानुसार हा साठा जप्त करून सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
रवी ऑइल इंडस्ट्रीजचा परवाना निलंबित
दुसऱ्या कारवाईत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मेसर्स रवी ऑइल इंडस्ट्रीजमधून २,७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा सुमारे ४ लाख ८७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यानंतर या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.
तपासणीत एकूण ८६ गुणांपैकी उद्योगाला केवळ ३० गुण मिळाले. परवान्यावर उत्पादन व्यवसायाची नोंद असताना प्रत्यक्षात तेलाचे पुनर्पॅकिंग सुरू असल्याचे आढळले. तसेच खाद्यपदार्थ व पाण्याचे प्रयोगशाळा अहवाल, पॅकिंग साहित्याचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र, कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक संरक्षणात्मक कपडे आणि स्वच्छतेसंबंधी आवश्यक व्यवस्था व नोंदींचा अभाव आढळला.
परवाना निलंबित असल्याच्या काळात संबंधित उद्योगाला अन्न उत्पादन, प्रक्रिया किंवा विक्री करता येणार नाही. सर्व त्रुटी दूर करून पुरावे सादर केल्यानंतर आणि प्रशासनाच्या फेरतपासणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*