छत्रपती संभाजीनगर : लग्न म्हटले की मोठा मंडप, आकर्षक सजावट, हजारो पाहुणे आणि लाखोंचा खर्च, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असताना कौटुंबिक आनंदाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याऐवजी त्यातून गरजूंच्या आयुष्यात दिलासा निर्माण करण्याचा वेगळा विचार मंत्री अतुल सावे आणि उद्योजक अजित मुळे यांच्या परिवाराने केला आहे. मुलाच्या विवाहाचा खर्च मर्यादित ठेवत या दोन्ही कुटुंबांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

अतुल सावे यांचे धाकटे सुपुत्र अनुराग आणि उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांचा विवाह २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या विवाहासाठी मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांना आमंत्रित करून भव्य सोहळा आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, सध्याची राज्यातील परिस्थिती आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पाहता उत्सवावर मोठा खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका दोन्ही परिवारांनी घेतली.

त्यामुळे विवाह घरगुती आणि साध्या पद्धतीने पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले. केवळ खर्चात कपात न करता त्यातून वाचणाऱ्या रकमेत स्वतःच्या निधीची भर घालून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.

बुधवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री अतुल सावे आणि अजित मुळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अजिंक्य सावे उपस्थित होते.

आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड 

शेतीचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि दुष्काळामुळे अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी स्वतःचा आनंद साजरा करताना समाजातील संकटग्रस्त घटकांचाही विचार व्हावा, या भावनेतून सावे-मुळे परिवाराने हा निर्णय घेतला. विवाहाच्या निमित्ताने केलेल्या या मदतीतून सामाजिक उत्तरदायित्वाचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

455 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क