छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबन आदेश लागू असतानाही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या चार आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत त्या सील केल्या आहेत. यामध्ये दोन ऑईल रिपॅकिंग युनिट, एक मिठाई उत्पादक आणि एका फराळ उत्पादक आस्थापनेचा समावेश आहे.
अन्न प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सील करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लासूर येथील मेसर्स गुरू गणेश ऑईल रिपॅकिंग युनिट आणि मेसर्स रवी ऑईल रिपॅकिंग युनिट, स्टेशन रोड एमआयडीसी परिसरातील मेसर्स मधुर मिलन मिठाई उत्पादक तसेच साई भंडार फराळ उत्पादक या चार आस्थापनांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या चारही आस्थापनांचे परवाने यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. मात्र, निलंबनाचा कालावधी सुरू असतानाही संबंधित व्यावसायिकांकडून व्यवसाय सुरू ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. अन्न प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित आस्थापनांवर पाळत ठेवली होती. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे आणि प्रशांत कुचेकर यांनी प्रत्यक्ष कारवाई करत चारही आस्थापना सील केल्या.
या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित चारही आस्थापनांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निलंबन कालावधीत व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यासह संबंधितांचे अन्न परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असा कडक इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*