छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि लक्ष्मीच्या आगमनाची चाहूल. मात्र, यंदाच्या दिवाळीला कॅलेंडरमधील एका खास योगायोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा लक्ष्मीपूजनाचा दिवस रविवारी येत असून, असा योग पुन्हा अनुभवण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन दशके वाट पाहावी लागणार आहे.

८ नोव्हेंबर २०२६ हा दिवस रविवार असून याच दिवशी देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या ५० वर्षांतील हा सातवा प्रसंग आहे, जेव्हा दिवाळीतील लक्ष्मीपूजन रविवारी आले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी दिनदर्शिकेच्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

यापूर्वी १९७९, १९८२, १९९२, १९९६, २०१९ आणि २०२३ या वर्षांमध्ये लक्ष्मीपूजन रविवारी झाले होते. आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा हा योग जुळून आला आहे. मात्र, यानंतर लगेच असा योग येणार नसल्याने यंदाच्या लक्ष्मीपूजनाची विशेष चर्चा होत आहे.

पुढील योगासाठी २० वर्षांची प्रतीक्षा

यंदाच्या रविवारच्या लक्ष्मीपूजनानंतर पुढील असा योग २८ ऑक्टोबर २०४६ रोजी जुळून येणार आहे. म्हणजेच सध्याच्या पिढीला पुन्हा रविवारी लक्ष्मीपूजन अनुभवण्यासाठी २० वर्षे थांबावे लागेल. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०७० रोजी पुन्हा लक्ष्मीपूजन रविवारी येणार असल्याची नोंद पंचांगातील तारखांच्या आधारे देण्यात आली आहे.

कुटुंबीयांसाठीही आनंदाची संधी

लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. या दिवशी घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन, दिव्यांची रोषणाई आणि फराळाचा आनंद घेतला जातो. रविवारची सुट्टी असल्याने नोकरदार वर्गासह अनेकांना कोणतीही धावपळ न करता कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करता येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतील हा दुर्मिळ योग केवळ धार्मिकच नव्हे, तर कौटुंबिक आनंदाच्या दृष्टीनेही खास ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

154 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क