छत्रपती संभाजीनगर : शहरातील एखाद्या दुकानात चोरी झाली किंवा रस्त्यावरून एखादी संशयास्पद व्यक्ती गेली, तर तिचा माग काढण्यासाठी पोलिसांना आता अधिक मदत मिळणार आहे. शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक ठिकाणांभोवती सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील २३ प्रकारच्या आस्थापनांना त्यांच्या परिसरातील किमान ५० मीटर अंतरापर्यंत स्पष्ट चित्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील ६० दिवस हा आदेश लागू राहणार असून, ४ जानेवारी २०२७ पर्यंत संबंधित आस्थापनांना नियमांचे पालन करावे लागेल.
केवळ कॅमेरे बसवून चालणार नाही!
या आदेशात सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेवरही भर देण्यात आला आहे. कॅमेऱ्यांमध्ये दुकान किंवा इमारतीबाहेरील रस्ता आणि परिसर स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. ही यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी लागणार असून, रेकॉर्ड झालेले फुटेज किमान १५ दिवस सुरक्षित ठेवावे लागेल. पोलिसांनी मागणी केल्यास संबंधित फुटेज तातडीने उपलब्ध करून देणेही आस्थापनांची जबाबदारी असेल. परिसरात संशयास्पद हालचाली किंवा अनुचित प्रकार दिसल्यास पोलिसांना कळवावे लागणार आहे.
बँकांपासून रुग्णालयांपर्यंत नियम लागू
या निर्णयाच्या कक्षेत बँका, एटीएम, वित्तीय संस्था, सराफी दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, पेट्रोल पंप, सुपर मार्केट, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, निवासी टॉवर्स यांसह एकूण २३ प्रकारच्या आस्थापनांचा समावेश आहे.
नियम मोडल्यास थेट कारवाई
शहरातील चोरी, घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजचा मोठा उपयोग होऊ शकतो. विशेषतः गुन्हा घडल्यानंतर संशयितांचा मार्ग शोधणे आणि त्यांची ओळख पटवणे अधिक सोपे होईल. त्यामुळे संबंधित आस्थापनांनी आदेशाकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक व्यवस्था करावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*