छत्रपती संभाजीनगर : अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्यासाठी दिवाळीचा सण मोठ्या संकटाचा ठरला. खात असताना बदामाचा तुकडा थेट श्वसनमार्गातून फुफ्फुसात गेल्याने त्याला श्वास घेणेही कठीण झाले. प्रकृती गंभीर झाल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वासाची मदत द्यावी लागली. मात्र, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पहाटेच्या सुमारास तातडीची शस्त्रक्रियेसदृश प्रक्रिया करत बदामाचा तुकडा बाहेर काढला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.

शनिवारपासून या बालकाला अस्वस्थ वाटत होते. श्वास घेण्यास त्रास वाढत असल्याने कुटुंबीयांनी त्याला घाटी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अन्नाचा कण श्वसनमार्गातून फुफ्फुसात पोहोचल्याचे समोर आले. हा प्रकार गंभीर असल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले. चिमुकल्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवून पुढील उपचारांची तयारी करण्यात आली.

यानंतर ब्रोन्कोस्कोपी तंत्राचा वापर करून श्वसनमार्गात अडकलेला बदामाचा तुकडा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. दिवाळीच्या पहाटे पार पडलेल्या या उपचारामुळे एका कुटुंबावरील मोठे संकट टळले.

अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ईएनटी विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी उपचारांचे नेतृत्व केले. बालरोग विभागाच्या डॉ. तृप्ती जोशी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. गणेश निकम, ईएनटी विभागातील डॉ. गणेश मोहन, डॉ. ओमप्रकाश, डॉ. ऋतुजा, डॉ. वत्सल आणि डॉ. प्रशांत यांच्यासह निवासी डॉक्टर, परिचारिका व ओटी-१ मधील कर्मचाऱ्यांनी उपचारात सहभाग घेतला.

पाच वर्षांखालील मुलांच्या आहाराबाबत विशेष खबरदारी आवश्यक 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी पालकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. लहान मुलांना अख्खे बदाम, काजू, शेंगदाणे देणे टाळावे. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांना असे पदार्थ दिल्यास ते श्वसनमार्गात अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे मुलांच्या वयानुसार खाद्यपदार्थांचे योग्य तुकडे करून किंवा सुरक्षित स्वरूपातच द्यावेत. तसेच मुले खात असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

122 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क