छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी; मात्र या उत्सवाचा शहराच्या पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात झालेल्या प्रचंड फटाकेबाजीमुळे वातावरणात धुराचे साम्राज्य पसरले. परिणामी शहरातील हवेची गुणवत्ता अचानक खालावली आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०६ पर्यंत जाऊन पोहोचला. ही पातळी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.

रविवारी रात्री शहरातील विविध चौक, वसाहती आणि बाजारपेठांमध्ये फटाके फोडण्याची मोठी चढाओढ पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीमुळे हवेत धूर, राख आणि अतिसूक्ष्म प्रदूषित कणांचे प्रमाण वाढले. काही परिसरांमध्ये धुराचे इतके दाट थर निर्माण झाले की, रस्त्यांवरील वातावरण धूसर झाले होते. दिवाळीच्या उत्साहात ध्वनिप्रदूषणासोबतच वायुप्रदूषणाची समस्याही अधिक तीव्र झाली.

प्रदूषणाच्या नोंदींनुसार, रात्री ११.३० वाजता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०६ वर पोहोचला. मध्यरात्री १२ वाजता तो ३६५ इतका नोंदविण्यात आला. पहाटेच्या सुमारास प्रदूषणाची तीव्रता कमी होण्याऐवजी त्यात चढ-उतार सुरूच होते. सकाळी ७ वाजता १७९, ८ वाजता २३५ आणि साडेआठ वाजता २४१ अशी नोंद झाली.

सरकारी निरीक्षण केंद्रांवरही प्रदूषणाचे आकडे वाढले 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपवरील आकडेवारीनुसार, वाळूजमधील मोरे चौक येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००, चिकलठाणा एमआयडीसी परिसरात १६०, तर रचनाकार कॉलनीमध्ये २०७ नोंदविण्यात आला. यावरून शहराच्या विविध भागांमध्ये प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक काळजीची गरज 

हवेतील प्रदूषित कणांचे प्रमाण वाढल्याने श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. विशेषतः दमा, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार असणाऱ्यांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या काही तासांच्या आतषबाजीचा परिणाम दुसऱ्या दिवशीही वातावरणात जाणवत असल्याने नागरिकांनी प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवाळीचा आनंद साजरा करताना पर्यावरणाची किंमत मोजावी लागू नये, यासाठी फटाक्यांचा वापर मर्यादित ठेवण्याची आवश्यकता या आकडेवारीतून अधोरेखित झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

196 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क